सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांच्या २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९८ उमेदवारांना सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्ती देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार निरंजन डावखरे यांना दिले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग-१ मधील ९८ उमेदवारांची सर्व प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. या संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
तसेच या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी तत्काळ दखल घेऊन पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.