नागपूर : विरोधी पक्षाने चहापान बहिष्कार घातला. चर्चेसाठी हे चहापान असते. पुढच्या वेळी सुपारी पान ठेवावे लागेल असे वाटते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांची पत्रकार परिषद पाहिली त्यात काही लोक झोपी गेले होते. तशाच झोपेत हे पत्र लिहिले का असा प्रश्न पडतो. तीन राज्यात ते जसे झोपले, तसेच झोपेत पत्र लिहीले आहे. विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ मराठवाड्याचा विसर पडला आहे. राज्यात काय चाललेय याचे भान नाही. कंत्राटी भरतीचा त्यांनी उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर दीड महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र हा क्राईम मध्ये दुसरे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. परंतु, एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे शिकले पाहिजे. एकूण लोकसंख्येवर हे आकलन होत असते. ३ लाख ९४ हजारांहून एकूण गुन्हे ३ लाख ७४ हजार झाले आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर आपण आठव्या क्रमांकावर आहे. खुनाचा उल्लेख केला तर महाराष्ट्र १७व्या क्रमांकावर आहे. महिलांवरील गुन्हे पाहिले तर राजस्थान तिथे लोकसंख्या आपल्या तुलनेत अर्धी आहे. तिथे, ओरिसा या राज्यात आपल्याहून अधिक प्रमाण आहे, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या आरोपांवर दिलं आहे.
हिवाळी अधिवेशनात काही बॅनर लावलेले आम्ही पाहिले. १० दिवसच अधिवेशन, मात्र ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही, ते बोलू लागलेत. आम्ही बोलायचो अधिवेशन घ्या. नागपुरात अधिवेशन घ्यायचे म्हटले की कोविड यायचा. आम्ही बीएसी घेऊन अधिवेशन वाढवण्यासाठी तयार आहोत. आधी त्यांनी आरशात पाहण्याची गरज आहे. चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले आहेत.
आता झालेल्या राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काहीतरी आत्मपरिक्षण विरोधी पक्ष करेल, नाहीतर ईव्हीएममुळे जिंकले असे बोलतील नाहीतर याहून अधिक पानिपत, जे लोकसभेत होणारच आहे ते पुढेही होईल, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.