मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण द्या
कल्याण डोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांची आयुक्तांकडे मागणी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला हटाव कारवाईतून वगळून मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या धर्तीवर संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी नुकतीच महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
कल्याण डोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेता राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांच्या माध्यमातून आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेत
त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कल्याण जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष संतोष ठाकरे आणि कल्याण जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघाचे सरचिटणीस सुधीर कश्यप यांनी हे निवेदन सादर केले. याप्रसंगी पत्रकार प्रविण आंब्रे हेही उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांना महापालिकेच्या फेरीवाला हटाव कारवाईतून वगळण्यात यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. आयुक्त वेलरासू यांनी याप्रकरणी अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. अशाच स्वरुपाची मागणी मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यासंदर्भात निर्देश दिले असून त्यानुसार मुंबई महापालिकेने आदेशही निर्गमित केले आहे. ठाणे महापालिकेने देखील तेथील वृत्तपत्र विक्रेत्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.