ठाणे :  आगामी निवडणुकीसाठी ठाणे, कल्याण डोबिंवली, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई विरार या पाच महापालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. मात्र प्रभाग रचना ही शिवसेनेसाठी अनुकूल असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आता प्रभाग रचनेविरोधात भाजपने दंड थोपटले आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेवर निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष वेधलय.

मंत्र्यांच्या मतदारसंघातच सहा नगरसेवक वाढले  : निरंजन डावखरे 

भाजपाचे आमदार व ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी ठाण्यात प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे. काही राजकीय पक्षांना अनुकूल असलेली व सध्या जाहीर केलेली प्रभागरचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभागरचना करावी, अशी मागणी भाजपाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.  घोडबंदर रोड, दिवा परिसरात नगरसेवकांची संख्या वाढण्याची सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र, ठाणे शहराची केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्र्यात ४, तर ८२ टक्के लोकसंख्या असलेल्या ठाण्यात ७ नगरसेवक वाढले. त्यात वागळे इस्टेट भागातील पाच वाढीव जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातच सहा नगरसेवक वाढले. मात्र, झपाट्याने लोकसंख्या वाढ झालेल्या घोडबंदर रोड व दिवा भागात नगरसेवकांची संख्या घटली. त्यामुळे प्रभागरचनेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे डावखरे यांचे म्हणणे आहे.

प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठीच : रविंद्र चव्हाण 

भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेला लक्ष्य केलय.  केडीएमसीत प्रशासनाला हाताशी धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी प्रभाग वाढले पाहिजे त्या ठिकाणी वाढले नाहीत. हे प्रभाग दुसऱ्या ठिकाणी वाढले. संपूर्ण प्रभाग रचना ही कायदेबाह्य आहे. नदी, रस्ते याचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. ही प्रभाग रचना फक्त शिवसेनेची सोयीसाठी करण्यात आली आहे. आपल्याच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. दरम्यान  मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेवरून टीका केली. प्रभाग रचनेत मनसेच्या माजी नगरसेवकांचा प्रभाग फोडण्यात आलेत, प्रभाग रचना तर कधीच झालेली आहे, शिवसेनेचे उमेदवारही ठरलेले आहेत, जिसकी लाठी उसकी भैस, ज्यांची सत्ता त्यांच्या प्रमाणे प्रभाग रचना झाली, राज्यकर्त्यांनी आपलं अपयश मान्य केलं त्यांना भीती वाटते म्हणून वॉर्ड रचना फोडली जाते अशी त्यांनी टीका केली. 

याविरोधात न्यायालयात धाव घेणार : गणेश नाईक 

भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नव्या प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे प्रभाग रचना करणा-या पालिकेच्या अधिका-यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली चुकीच्या पध्दतीने प्रभाग रचना करण्यात आलीय असा आरोप नाईक यांनी केला आहे या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केलय ज्या ज्या प्रभागात चुकीची रचना करण्यात आलीय त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात येणार आहे राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमबाहय प्रभाग रचना करणा-या अधिका-यांवर कायदेशी कारवाई करण्याचीम ागणी नाईक यांनी केली आहे. 

ठाण्यातून सूत्रे हलली  : बविआचा आरोप 

वसई विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेत शिवसेनेचा वरचष्मा असून ठाण्यातून सुत्रे हलली असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. मात्र प्रभाग रचना कशीही तयार केली असली तरी आम्हाला याचा कोणताही फटका बसणार नाही. सर्वच जागांवर आमचेच वर्चस्व कायम राहणार असून सत्ताही आमचीच कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता अजीव पाटील यांनी व्यक्त केलीय. तसेच, वसई-विरारमधील चांगले प्रभाग तोडून वेगळे केले आहेत. त्यामुळे यामधून सेनेला राजकीय फायदा होईल, या दृष्टीने प्रभागरचना तयार केली असल्याचा आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!