ठाणे , दि. 9 : ठाणे जिल्ह्यामध्ये दि.१ नोव्हेंबर पासून ते ३० नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम ‍राबविण्यात येत असून जे युवा युवती दि. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यांना या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. १३, १४, २७ आणि २८ नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यातील युवा-युवतींना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात २०२२ मध्ये महापालिकांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार असून दि. ३० नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी केलेल्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. जेणे करुन त्यांना येत्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यासाठी जे युवा-युवती १ जानेवारी २०२२ मध्ये वयाची १८ वर्ष पूर्ण करतील. त्यांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात भेट द्यावी. अथवा NVSP पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन, जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.

मतदार यादीमधून मृत नातेवाईंकाचे नाव वगळण्यासाठी, एकच नाव दोन ठिकाणी नोंदविले असल्यास त्यातील एक नाव वगळण्यासाठी अर्ज क्र.७ भरुन द्यावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झालेल्या आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रकाशित झालेल्या प्रारुप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव, जन्म तारीख, वय, छायाचित्र ओळखपत्र क्रमांक, लिंग, पत्ता, मतदार संघ, नातेवाईकाचे नाव, त्यांच्याशी असलेले नाते आदि बाबी मतदार यादीत अचूक आहेत याची पडताळणी करावी. त्याबाबत काही बदल करावयाचे असल्यास त्यासाठी नमुना नं.८ भरुन मतदार नोंदणी कार्यालयात अथवा ऑनलाईन सादर करावा, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली. विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5ब, अहमदनगर- 9क, नांदेड-वाघाळा- 13अ, मीरा-भाईंदर- 10 ड आणि 22अ, सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि पनवेल- 15ड.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *