मुंबई/ प्रतिनिधी : कोविड – १९ या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयातील ‘लिफ्ट’मध्ये बसविण्यात आलेल्या ‘फूट ऑपरेटेड’ तंत्रज्ञानाने यापूर्वीच अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. याच श्रृंखलेत आता ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयात ‘सेन्सर’ आधारित स्वयंचलित थर्मामीटर, सेन्सर व टायमर आधारित कार्य करणारे हात धुण्याचे मशीन, याच पद्धतीने काम करणारे सॅनिटायझर मशीन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजळ बसविण्यात आले आहेत.
प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ इत्यादी परिसरांचा समावेश असणा-या महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाची लोकसंख्या ही सुमारे ३ लाख ८९ हजार इतकी आहे. या विभागाचे प्रशासकीय कार्यालय प्रभादेवी (पश्चिम) रेल्वेस्टेशन जवळील धनमिल नाक्याजवळ व ना.म.जोशी मार्गालगत आहे. याच विभाग कार्यालयाच्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभिनव उपयोग करुन कोविड विषयक विविध प्रतिबंधात्मक बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कार्यालयात येणारी प्रत्येक फाईल देखील प्रवेशद्वारावर असणा-या ‘अल्ट्रा व्हायलेट’ किरणांनी (यु.व्ही रेज) निर्जंतूक केली जात आहे. त्याचबरोबर कार्यालयात असणा-या प्रत्येक ‘बेसीन’चा नळ हा स्पर्शरहित पद्धतीने वापरता यावा, यासाठी या नळांना देखील सेन्सर बसविण्यात आले आहेत. तर कार्यालयातील शौचालयांमध्ये ऑटोमॅटिक सॅनिटायझर्स बसविण्यात आले आहेत, त्यामुळे ठराविक कालावधीनंतर शौचालय स्वयंचलित पद्धतीने सॅनिटाईज होत आहेत.यापैकी बहुतांश यंत्रांचे डिझाईन व निर्मिती महापालिकेच्याच अभियंत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली आहे. विशेष म्हणजे जी दक्षिण विभागातील या अभिनव प्रतिबंधात्मक उपाय योजना समजावून घेण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाला अभ्यास भेटी दिल्या आहेत आणि या उपक्रमांचे कौतुक करत त्यांच्याही कंपन्यांमध्ये या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे; अशी माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.
—–