, ११ वर्षीय हिरेन राम हिसालगेचा ५ तासात ७५ किमी सायकल चालवण्याचा नवा विक्रम
कर्जत. दि.१५. राहुल देशमुख : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सबंध देशासाठी होते. त्यामुळे त्यांची जयंती देखील सर्वानी साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांचे कार्य सर्वाना समजले पाहिजे हा निर्मळ उद्देश घेऊन ११ वर्षीय सायकलपटू हिरेन हिसालगे याने ७५ किलोमीटरची सायकल राईड तब्बल ५ तासात पूर्ण केली आहे. हि सायकल राईड करत हिरेन याने बाबासाहेब यांना जयंतीदिनी आगळीवेगळी वंदना दिली आहे.
१४ एप्रिल म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या जयंती निमित्त नेरळ येथील सायकलपटू हिरेन राम हिसालगे याने भिम जयंती साजरी करुया, बाबासाहेबांचे कार्य घरोघरी पोहचवुया हे ब्रीद वाक्य घेत ७५ किलोमीटर सायकल राईडचा उपक्रम हाती घेतला. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा सायकलवर लाऊन भारताचा तिरंगा ध्वज फडकवत तब्बल ७५ किलोमीटर अंतर तब्बल ५ तासात सायकलवर पार केलं आहे.
सायकलिंगची सुरुवात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मोहाची वाडी येथुन सकाळी ५:३० वाजता झाली. त्यानंतर शेलु, वांगणी, पाषाणे, मार्गे साळोख, कळंब, कशेळे, कडाव, कर्जत, डिकसळ मार्गे नेरळ येथील हुतात्मा चौक येथे हिरेन पोहचला. या प्रवासामध्ये ठिक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी हिरेनचे स्वागत करुन त्याला शुभेच्छा दिल्या. तर नेरळ येथे हुतात्मा चौकात दाखल त्याने हुतात्म्यांना अभिवादन केले. तर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सम्राट नगर येथे सायकलिंग सकाळी ११:०० वाजता समाप्त करण्यात आली. याठिकाणी सम्राट युवक मंडळाचे अध्यक्ष सम्यक सदावर्ते व उपाध्यक्ष ऋषिकेश सदावर्ते यांच्या हस्ते हिरेन याचा सन्मान करण्यात आला.
या अगोदर देखील हिरेन याने सायकलिंग करत समाजातील अनेक प्रश्नांना बोलके स्वरूप दिले. यामध्ये हवामानशास्त्र दिनी त्याने प्रतीकात्मक कुत्रिम प्राणवायू सिलेंडर आणि मास्क लावून जनजागृती केली होती. तर २ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या हुतात्मा दिनी देखील नेरळ ते सिद्धगड अशी सायकल राईड हिरेन याने केली होती.