पुणे : संसद भवनाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. आमची बांधिलकी जुन्या संसदेशीच आहे, जुन्या संसदेसोबत आमच्या भावना जुळल्या आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना निशाणा साधलाय.
शरद पवार म्हणाले, आज नवीन संसदेचं उद्घाटन झालं. तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मी तिथे गेलो नाही याचं मला समाधान वाटलं. उद्घाटनावेळी जे कर्मकांड सूरू होतं, ते पाहिल्यानंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवारहलाल नेहरूंनी मांडली होती आणि आताचा हा कार्यक्रम यामध्ये फरक आहे. यामुळे आपण काही वर्षे पाठीमागे गेलो की काय, अशी स्थिती आहे.
नेहरूंची आधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सातत्याने होती. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती-उपराष्ट्रपती उपस्थित नव्हते. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, असं पवार यांनी म्हटलं. नव्या संसदेचा सोहळा काही लोकांपुरताच आहे. एवढा मोठा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नाही, अशी टीका पवार यांनी केली.