मुंबई : अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं… तरूणांना संधी कधी देणार ? वय ८३ झालं आता तरी थांबा. आम्ही दुस-याच्या पोटी जन्माला आलो हि आमची चूक आहे का ? असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यावर केला.
मुंबईतल्या एमईटी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या जाहीर भाषणामध्ये अजित पवार बोलतांना म्हणाले की, एक वय असतं. त्या वयात थांबावं लागतं. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबायलाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का ? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल केला. मागील महिन्यात त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा सवालही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना परदेशीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. २००४ ला छगन भुजबळ आणि आर.आर. पाटील यांच्या नेृत्वाखाली पक्षाला मोठं यश मिळालं. सोनियांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याविषयी भूमिका घेतली होती.त्यावेळी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते. त्यावेळी चार खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यावेळी मुख्यमत्रीपद मिळालं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता.
पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलो आहे. मी कधीही जाती पातीचे नात्या गोत्याचे राजकारण केले नाही सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असायला हवा. महाराष्ट्राचा विकास हेच माझे स्वप्न आहे. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे राज्य जाणतो. माझी काय चूक झाली मला नेहमी जनतेसमोर व्हिलन करत आहात ? सवालही अजित पवार यांनी केला.
२०१९च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवारांनी उघडपणे भूमिका मांडली. २०१९ला भाजपसोबत जायचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला होता. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून मला ही जबाबदारी दिली गेली होती, असं अजित पवार यांनी म्हटलं.
२०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. नंतर आम्हांला फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित रहायला सांगितलं. मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही असेही अजित पवार म्हणाले.