देशातील जनतेला राष्ट्रवाद शिकवू नका 
शरद पवारांचा मोदींना टोला 
डोंबिवली (प्रतिनिधी) : देशासाठी कुर्बानी देण्याची भूमिका ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे देशातील जनतेला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. मात्र पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे  देशातील राष्ट्रवाद वाढवण्यासाठी आम्ही हे करतोय, ते करतोय असे सांगत फिरत असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी डोंबिवलीत केली. यावेळी पवार यांनी चीन युध्दाची आठवणही जागवली.

कल्याण लोकसभेतील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण शीळ रोडवरील प्रिमीअर मैदानात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, अरूण गुजराथी, काँग्रेसचे नेते संतोष केणे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
पवार पुढे म्हणाले की, चीनचे युद्ध झाल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती ठिक नव्हती. त्यावेळी देशातील लोकांनी रस्त्यात उतरून युद्धात सामील झालेल्या जवानांसाठी आणि देशासाठी जमेल ती मदत केली. आया बहिणींनी हातातील बांगड्या काढून दिल्या. हे आपण स्वतः पाहिलं असल्याची आठवण करून देत आज हीच निती हीच भावना देशातील प्रत्येक घटकामध्ये आहे असे पवारांनी सांगितले. पण नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे  देशातील राष्ट्रवाद वाढवण्यासाठी आम्ही हे करतोय, ते करतोय असे सांगत फिरत असल्याची टिका पवार यांनी यावेळी केली.  2017 ते 2019 या दोन वर्षांत 11 हजार 998 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. बेकार तरुणांची संख्या वाढत चालली आहे, आमच्या आया बहिणींकडे या राज्यकर्त्यांचे लक्ष नाहीये, देशातील उद्योग व्यवसाय बंद होत आहेत,  गेल्या 5 वर्षात कोणतेही ठोस काम न केल्यामुळे यांना आज देशाच्या नावाखाली मतं मागण्याची वेळ आली आहे असा हल्ला पवार यांनी केला. डोंबिवलीत साडेसहा हजार कोटी रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्रयांनी केली पण एक पैसाही आला नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर बेफिकीर राहणाऱ्या सरकारविरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल असे पवार यांनी ठणकावून सांगितले.

—————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!