मुंबई : राष्ट्रवादी काँगेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ते भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले होते.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झाला. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला . १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत. असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात चांगलेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यावेळी हा निर्णय मागे घ्यावा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
काय म्हणाले अजित पवार
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. तुम्ही निवृत्त होऊ नका असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रडत-रडत समजावण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी म्हटले की भावनिक होऊ नका, काकी (प्रतिभा पवार) म्हणाल्या की ते अजिबात निर्णय मागे घेणार नाही. “नव्या अध्यक्षाला आपण साथ देऊ, त्याच्या पाठिशी उभे राहू”, असेही अजित पवार म्हणाले. “हा एक प्रकारचा शॉक आहे. भाकरी फिरवायची म्हणजे लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला होता. पवार साहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. नवा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला तो का नको ? ते कालच हा निर्णय जाहीर करणार होते, मात्र मविआच्या सभेमुळे त्यांनी हा निर्णय पुढे ढकलला होता. असेही अजित पवार म्हणाले.
नवा अध्यक्ष समिती ठरवणार ..
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अध्यक्ष पदासाठी तीन नेत्यांची नावे चर्चिली जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ही तीन नावे आहेत, त्यामुळे अध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतय हे पाहावं लागणार आहे.