खड्डयाविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
डोंबिवली : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत शनिवाारीअनोखे आंदोलन केले. रस्त्यावर पडलेले खड्डे रंगवून आणि त्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नावे देऊन कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी काल झालेल्या एल्फिस्टन पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून मग आंदोलनाला सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीतील नागरिक विविध नागरी समस्यांनी प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र त्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी राजकारण करण्यातच दंग झाले आहेत. एकीकडे नागरिकांकडून पद्धतशीरपणे कर वसुली केली जात असताना सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंबाबोंब आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याची माहिती सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली. पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून सुरू झालेले हा आंदोलन घरडा सर्कलपर्यंत करण्यात आले. यावेळी खड्डे रंगवण्याबरोबरच त्या खड्डयांना महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली. यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण शहर राष्ट्रवादीचे संदीप देसाई, कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, सुभाष गायकवाड, राष्ट्रवादी महिला विभागाच्या रेखा सोनावणे, संगीता मोरे, सेजल राऊळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.