कल्याण, भिवंडीत राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल
कल्याण : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे महागाईच्या कचाट्यात सर्वसामान्य जनता अडकल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करीत कल्याण – डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादीतर्फे कल्याण तहसील कार्यालयावर संबळ वाद्याने दवंडी देत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. तर भिवंडीतही राज्य सरकारविरोधात हल्लााबोल करण्यात आला. यावेळी गाढवाच्या गळयात गधो कि सरकार असा फलक लावण्यात आला होता.
कल्याण डोंबिवली महापालीका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकातून शिवाजी चौक-महम्मदअली चौक-नेहरु चौक-स्टेशन रोड मार्गे कल्याण तहसिल कार्यालय पर्यंत हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, हनुमंत जगताप, सारिका गायकवाड, वंडार पाटील, जे. सी. कटारिया, सुभाष गायकवाड यांच्यासह सर्वच सेलचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. गेली तीन वर्षांपासून सत्तेवर आलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. दरम्यान, केंद्रातील सरकारच्या नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड वाढल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. हे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय न घेता नुसती फसवी जाहिरातबाजी करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी चौकाचौकात ठिय्या आंदोलन देखील केले. नुसती पोकळ आश्वासने देऊन केंद्र व राज्य सरकारनी जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, महिलावर्ग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, ग्राहक अशा सर्वच घटकांमध्ये सत्ताधारी सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आज हल्लाबोल मोर्चा काढण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे आ. जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भिवंडीतही राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भिवंडी शहर अध्यक्ष मो.खालिद गुड्डू यांच्या नेतृत्वातखाली प्रांत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर आलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णतः अपयशी ठरले आहे.नुसती पोकळ आश्वासने देऊन राज्याच्या जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील तकरी, कष्टकरी कामगार, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर , महिलावर्ग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, ग्राहक अशा सर्वच घटकांमध्ये *या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रातील सरकारच्या *नोटबंदी व जी.एस.टी.निर्णयामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.पेट्रोल,डिझेल व गॅसदरवाढीमुळे महागाईचा भस्मासुर माजला असून सामान्य जनता हवालदिल झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय न घेता सरकार नुसती फसवी जाहिरातबाजी करत आहे अशी टीका गुड्डू यांनी केली.