राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव डावखरे यांच निधन
ठाणे (संतोष गायकवाड) : ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे आज बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले, ते ६८ वर्षांचे होते. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबध होते, त्यामुळे अजात शत्रू म्हणूनच त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला होता.
वसंत डावखरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४९ रोजी झाला. १९८६ साली ठाणे महापालिका स्थापन झाली तेव्हा काँग्रेसकडून ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९८७ ते ८८ त्यांनी ठाणे महापौरपद भुषवले. महापौरपदाच्या काळात वसंतराव डावखरे यांनी अनेक अविस्मरणीय उपक्रम ठाण्यात केले. लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार, महापौर रजनी, बाल नाटय़ महोत्सव, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, अपंगांच्या क्रीडा स्पर्धा इ. चे संयोजन एक वर्षाच्या अल्प मुदतीत रेखीवपणे केले गेले.१९९२ पासून ते विधानपरिषदेवर निवडून जात होते. सतत चार वेळा विधानपरिषदेवर ते निवडून गेले. १९९८ पासून त्यानी विधानपरिषदेचे उपसभापतीपद भूषवले. १३ जुलै २०१० ला त्याची विधानपरिषद उपसभापतीपदी फेरनिवड झाली होती. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनिय काम केल्यामुळेच त्यांना तीन वेळेस आमदार आणि विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम, विश्वास आणि घट्ट नाते वसंतराव डावखरे यांना लाभले होते. त्यामुळे मातोश्रीशी त्यांचे घरोब्याचे संबध होते. आनंद दिघे आणि वसंत डावखरे यांची एक वेगळीच मैत्री ओळखली जायची. दिलदार स्वभावाचा व हसतमुख नेता म्हणूनच त्यांची ओळख होती. ठाणे व कल्याण लोकसभा त्यानी लढवली मात्र आनंद परांजपे ( शिवसेना) यांच्याकडून त्याना पराभव पत्करावा लागला होता. ९ जून २०१० ते ८ जून २०१६ काळात ते शेवटचे विधानपरिषद सदस्य म्हणून शिवसेनेच्या रविंद्र फाटक यांचा पराभव करून निवडून आले होते. २५ मे १९९९ ला शऱद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरे हे राष्ट्रवादीत सामील झाले. शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले नेते म्हणूनच त्यांची ओळख होती. २०१० साली ते विधानपरिषदेवर बिनविरोध निव़डून गेले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बॉम्बे रूग्णालयात करण्यात आली होती. मात्र त्यांची तब्येत साथ देत नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांना बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पश्चात त्यांचे पूत्र आमदार निरंजन डावखरेए सून नातवंडे असा परिवार आहे वसंतराव डावखरे यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान झालय.
राजकारणापलीकडे मैत्री जपणारा नेता गमावला : मुख्यमंत्री
विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे त्यानी अंत्यदर्शन घेतले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
खंदा सहकारी हरपला : शरद पवार
माझे निकटचे सहकारी वसंत डावखरे यांचे आज दीर्घकालीन आजाराने निधन झाले. अतिशय मृदू स्वभावाच्या डावखरे यांनी सर्वपक्षीय मैत्र जपले होते. त्यांच्या विचारांची निष्ठा वादातीत होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवली. एक खंदा सहकारी हरपला याचे दुःख आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार त्यांनी टि्वटरवर व्यक्त केलीय