मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबादसह राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी आंदोलन केली. सत्तारांनी राजीनामा द्या, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका कार्यकत्यांनी घेतल्याने राज्यातील वातावरण चांगलचं तापलं. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली असून, सत्तारांवर कारवाई करावी असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
खोक्यावरून सुरू झालेला वादा आता आक्षेपाई टिप्पणीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात महिलावर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सत्तार यांच्या विधानानंतर त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी चाल करून जोरदार घोषणाबाजी करीत, त्यांच्या घरावर दगड फेकल्याने निवास्थानाच्या काचदेखील फोडली. दरम्यान सत्तार यांनी माफी मागितली असली तरी माफी काफी नही है असं म्हणत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांचा राजीनामा घेतल्याशिवाय मुख्यमंत्रयांना मंत्रालयात बसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी घेतली आहे. सत्तारांना राज्यात फिरू देणार नाहीत त्यांनी दिल्लीची सेक्युरिटी आणली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत असंही चव्हाण म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात सत्तार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कृषिमंत्री यांना सत्तेचा माज आला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली
ठाण्यात आणि पंढरपुरात सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारत दहन करण्यात आलं तसेच कोल्हापूर येथे महिला कार्यकत्यांनी सत्तारांचा निषेध करीत कोल्हापुरी चपलांचा आहेर दिला आहे. औरंगाबादमध्येही सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. पुण्यात बालगंधर्व चौकात कार्यकत्यांनी जोरदार आंदोलन केले तर सोलापूरात सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडेमारो आंदोलन केले. सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. “संसदेच्या सदस्य असलेल्या आणि सातत्याने ‘संसद रत्न’ किताब मिळवत असलेल्या सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. अब्दुल सत्तारांवर कारवाई झाली पाहिजे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार सातत्याने महिला राजकारण्यांवर ठरवून टीका करत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्तारांनी आता राजीनामा दिला पाहिजे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
राज्य महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांना पत्र
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यात “मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्धार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे,” असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.