मुंबई, 10 नोव्हेंबर : राज्याचे विरेाधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंडरवर्ल्डचा बॉम्ब फेाडल्यानंतर बुधवारी मंत्री नवाब मलिक यांनी अखेर हाड्रेाजन बाँम्ब फोडला. यावेळी मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठया पदावर बसवले तर बनावट नोटांच्या प्रकरणात फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यामुळे फडणवीस विरूध्द मलिक यांच्या आरोप प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बुधवारी मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर आरोप केले. फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. असा दावा मलिक यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूरचा मुन्ना यादव यांच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.
दाऊदचा जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. “२९ ऑक्टोबर रोजी रियाज भाटी सहार एअरपोर्टवर खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. ज्याचे संबंध अंडरवर्ल्डसोबत होते. रियाज भाटी वारंवार तुमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही रियाज भाटीने फोटो काढले. रियाज भाटी पंतप्रधानांपर्यत कसा पोहोचला ? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.
आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर ….
नवाब मलिकांनी आरोपांचा हायड्रोजन बॉम्ब फोडताच भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांचं खंडन करत प्रत्युत्तर दिलंय. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगीही लावू शकले नाहीत. नवाब मलिक यांची घालमेल इतकी होती का हायड्रोजन सोडा त्यांना आता ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यांनी मोठ मोठ्या गोष्टी सांगून त्याचा संबंध फडणवीस यांच्याशी लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही असे शेलार म्हणाले. मुन्ना यादव आणि हाजी अराफत आमचे पदाधिकारी आहेत. तुमचे सरकार आहे तुमचे गृहमंत्री आहेत. जर गंभीर गुन्हे होते तर मग यांना तुम्ही ताब्यात घेतले का नाही? इमरान आलम शेख हा तर काँग्रेसचा सचिव होता आणि आता तुम्ही बोलताय त्याचवेळी तो तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. आरोप करा आणि पळून जा असा प्रयत्न चालू आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचे खेाचक ट्विट …
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी नोबल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणि डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.