कल्याण:- नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे सध्या घराघरातील महिला वर्गाची खरेदीसाठी लगबग सुरू झालीय. बाजारपेठाही नवरात्र स्पेशल वस्तूंनी भरून गेल्या आहेत. नवरात्रीच्या पुजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कलश. म्हणजेच घटस्थापनेतील घट ! देवीच्या आगमनाबरोबरच घरोघरी देवीची स्थापना घट मांडून केली जाते. मातीच्या मटक्याना रंग देत मोती, काचा द्वारे सजवून आकर्षक घट तयार केले जातात. सुंदर व आकर्षक घटाची किंमत ५० ते १०० रुपयापर्यंत आहे. कल्याणच्या कुंभार वाड्यात घट तयार करण्यासाठीची लगबग सुरू असून शेकडो हात या कामात रात्रंदिवस गुंतले आहेत.
ओल्या मातीला आकार देत त्यापासून मटकी तयार केली जातात. संक्रातीला यांना सुगड, दहीहंडी ला हंडी, नवरात्रीत घट म्हणून तर इतर वेळी पाणी थंड करण्याचे मडके म्हणून ओळखले जाते. त्या त्या सणांच्या दिवशी या मटक्यांना आकर्षक पद्धतीने सजवले जातात.
नवरात्र जवळ येऊ लागताच कल्याण आणि मुंबई ठण्यातून देखील घटाची मागणी वाढते. गणेशोत्सवानंतर कुंभारवाडयात दिवसरात्र हे घट बनविले जातात. मातीच्या मटक्यांना रंग दिल्यानंतर विविध आभूषणांनी आकर्षकपणे सजविले जातात. एका घटाला सजविण्यासाठी किमान तासभर वेळ लागतो. कल्याणतील कुंभारवाडयात आतापर्यंत एक हजार घटांची विक्री झाली असून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत ही मागणी वाढत असते.