ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने यासंदर्भातल्या मार्गदशक सूचना जारी केल्यात .त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा लागणार आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी उत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे आदी बाबींस शक्यतो आळा घालावा.

नवरात्रौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले , हार , प्रसाद आदी विक्रीसाठी स्टॉल, दुकाने लावू नयेत. मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मुर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू,संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

आरोग्य विषयक उपक्रम राबवावे
गरबा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे तसेच कोरोना, मलेरिया , डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवी मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सींग मास्कचा वापर, सॅनीटायझर इत्यादी स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जतुकीकरण करावे. तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.

कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट,रोषणाई तसेच देखावे करु नयेत. नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक , भक्तीपर आदी गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी.तसेच उपस्थित सर्व व्यक्तिंनी मास्क लावणे बंधनकारक आहे यासोबतच सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे हे पाहण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची राहील. देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत, त्यांनी मास्क आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे .

देवीच्या विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडणे आवश्यक राहील. लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे . संपूर्ण चाळीतील , इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्तीचे एकत्रितरित्या विसर्जनास नेवून गर्दी करण्यास परवानगी असणार नाही सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये. तर वाहनातील देवीमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेवून जावे . विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास, पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळी देवीमुर्तीचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही, विसर्जन स्थळी मुर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी तेथे मुर्त्या जमा कराव्यात व त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटर, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी आवश्यकतेनुसार दरवर्षी केली जाणारी व्यवस्था चोखपणे करण्यात येणार आहे. कोविड -१९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असून मास्क, सोशल संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नवरात्रौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!