ठाणे, अविनाश उबाळे : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवीचे मंदिर सध्या रोषणाईने सजले आहे.जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या घाटनदेवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे.मंदिरालगत नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी यात्रा भरत असल्याने ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविक घाटनदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने येत आहेत.
मुंबईपासून दिडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात मुंबई-नाशिक महामार्गाजवळ नाशिक इगतपुरीच्या सरहदीवर घाटन देवीचं मंदिर आहे. संकट काळी भक्तांच्या हाकेला धाऊन जाणारी आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून घाटनदेवीची महिमा असल्याची धारणा भाविकांमध्ये आहे.महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इगतपूरी,घोटी,नाशिक, जळगाव, पुणे,नगर या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे.पहाटे पाचपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवासीही या ठिकाणी थांबून देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघत आहेत.
वाघावर आरुढ असलेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देते. घाटनदेवी मातेची विविध रूपे आहेत.यातील पहिले रूप शैलपुत्री, म्हणजेच घाटनदेवी होय.प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिर झाली.तीच ही घाटनदेवी होय,अशी देवीची आख्यायिका सांगितली जाते.मोठया श्रध्देने घाटनदेवीच्या दर्शनासाठी भाविक येतात नवरात्रोत्सव काळात येथे श्रद्धाळू भक्तांचा अगदी महापूर लोटतो आहे.