मुंबई : भाजपच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याचबरोबर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे देखील समोर आले आहे.
मागील दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली हेाती त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं त्यासाठी राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत, आपले आंदोलन रद्द केले. यानंतर आता शिवसेनेकडून त्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकारपरिषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपावर जोरदार टीका केली.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची आजची रात्र पोलीस ठाण्यात जाणार आहे. दरम्यानल खार पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा दाप्पत्याने जामीन घेण्यास नकार दिला आहे.