ठाणे/ प्रतिनिधी : नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून शिवसेना व काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने लेाकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची तर शिवसेनेकडून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली आहे. त्यामुळे लोकनेते दि बा पाटील कि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ? असा प्रश्न पडला आहे. सत्तेतील दोन पक्षांकडून वेगवेगळया नावाची शिफारस करण्यात आल्याने नवी मुंबईतील विमानतळ नामकरणावरून महाविकास आघाडीत काँग्रेस विरूध्द शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई प्रकल्पासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान मोठं आहे. लोकनेते दि. बा. पाटील हे पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ते मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी अशी अनेक पातळयांवर त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा अशी मागणी आगरी कोळी भूमीपूत्र महासंघाने काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली हेाती. ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबई येथील स्थानिक भूमिपुत्र संघटनांचा महासंघ असून या महासंघाचे सल्लागार व काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चव्हाण यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाची शिफारस केली हेाती. फडणवीस यांनीही ही मागणी उचित कार्यवाहीसाठी प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठवली हेाती. फडणवीस यांनी पत्राद्वारे चव्हाण यांना कळविले आहे. मात्र दोन वर्षानंतर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. काँग्रेसने फडणवीस सरकारच्या काळात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी केली होती, त्यावेळी शिवसेना फडणवीस सरकारमध्ये सहभागी हेाती. त्यावेळी पालकमंत्री हे एकनाथ शिंदे हेाते. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना एकत्रीत सत्तेत आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. मात्र शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे विमानतळ नामकरणासाठी काँग्रेस कि शिवसेना ? कोण माघार घेणार असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी आगरी कोळी भूमीपुत्र महासंघ व काँग्रेसने यापूर्वीच केलेली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई, पनवेल येथील साडेबारा टक्यांचा लढा देऊन स्थानिक भूमी पुत्रांना न्याय मिळवून दिला. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील भूमिपुत्रांसाठी ते देवता समान समजले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आमच्या मनात आदर आहे. मात्र नवी मुंबईसाठी दि. बा. पाटील यांचे योगदान मोठं आहे. (संतोष केणे, सल्लागार, आगरी कोळी भूमीपूत्र महासंघ व सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस )