नवी दिल्ली – भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात विनोद तावडे यांनी नवीन जिंदल भाजपात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अर्ध्या तासात जी यादी आली त्यात नवीन जिंदल हे नाव होतं. हरयाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवीन जिंदल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा रविवारीच दिला. त्यानंतर काही तासात त्यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत झळकलं.
भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत १११ नावं आहेत. पिलभीत या ठिकाणाहून वरुण गांधींचं तिकिट कापण्यात आलं आहे. तर कंगना रणौत, अरुण गोविल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. या सगळ्या नावांमध्ये एक नाव आणखी चर्चेत आहे ते म्हणजे नवीन जिंदल. नवीन जिंदल काँग्रेसमधून भाजपात आल्याची घोषणा झाली. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांचं नाव या यादीत झळकलं.
नवीन जिंदल हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. तसंच देशातल्या मोठ्या उद्योजकांपैकी नवीन जिंदल एक आहेत. त्याचप्रमाणे ते उत्तम खेळाडू आहेत. तिरंगा ध्वज फडकवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे हा हक्क मिळवून देणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. नवीन जिंदल हे वरिष्ठ काँग्रेस नेते ओ. पी. जिंदल यांचे पुत्र आहेत. हरयाणा सरकारमध्ये त्यांनी उर्जा मंत्री म्हणूनही काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाचं स्वप्न दाखवलं आहे. त्यामध्ये माझाही खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून भाजपात आलो आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असंही नवीन जिंदल यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी म्हटलं होतं.