‘मानाचि लेखक संघटना’ आयोजित नाट्यलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न
मुंबई – नाट्यक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या इच्छुक लेखकांना नाटकाच्या प्रकारांपासून सखोल नाट्यलेखन विषयक माहिती मिळावी या दृष्टीने मानाचि लेखक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेली विशेष नाट्यलेखन कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन २४, २५ मार्च रोजी बोरिवली, मुंबई येथे करण्यात आले होते.
मालिका, नाटक, चित्रपट अर्थात मानाचिने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे ऐंशीहून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते. लेखक संभाजी सावंत यांनी नाटकाच्या विविध प्रकारांची ओळख करून देत सुरु झालेल्या या कार्यशाळेत नंतर युगंधर देशपांडे यांनी प्रायोगिक नाटकांविषयी तर आनंद म्हसवेकर यांनी व्यावसायिक नाटकांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी स्पर्धेची नाटके या विषयावर संवाद साधला आणि प्रदीप राणे, विश्वास सोहोनी यांनी एकांकिकांचे विश्व उलगडले. अभिजित गुरु यांनी सस्पेन्स थ्रिलर नाट्यप्रकारातील विविध पैलू शिबिरार्थींना सांगितले. देवेंद्र पेम यांनी आपल्या विक्रमी ऑल द बेस्ट तसेच इतर नाटकांचा प्रवास स्पष्ट केला. गिरीश जोशी यांनीही आपल्या व्यावसायिक नाट्यलेखनाबाबत संवाद साधल्यावर राजेश देशपांडे, आशिष पाथरे, गणेश पंडित, सचिन मोटे यांनी उपस्थितांना विनोदी नाटकांविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि नाट्यसमीक्षक जयंत पवार यांनी नाटकाचा इतिहास आणि त्यात होत आलेला बदल उलगडून सांगितला. सुहास कामत, राजेश देशपांडे, राजीव जोशी, आभास आनंद, विनोद गायकर, स्वप्नील पाथरे आदींनी मान्यवरांसोबत संवादक म्हणून काम पाहिले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मानाचि सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या कविचार या काव्यलेखन स्पर्धेचा निकालही या कार्यशाळेत जाहीर करण्यात आला. यामध्ये महेश घाटपांडे, शर्वरी पेठकर, दीपक करंजीकर, अनिरुद्ध पांडे, सारिका ढेरंगे, कविता नवरे या विजेत्यांना जयंत पवार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेच्या ठिकाणी शिबिरार्थींसाठी अक्षरमानव संस्थेतर्फे सवलतीच्या दरात पुस्तकविक्री आयोजित करण्यात आली होती. तसेच मानाचि सदस्य सुहास कामत, सुनीता तांबे, शिवानी गोखले यांची पुस्तकेही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन सांगता झालेल्या या कार्यशाळेच्या सफलतेसाठी मानाचि सदस्य चेतन नाईक, पराग पुजारी, अनिकेत बोले, अभिराम रामदासी, वैखरी जोशी, अंजली जोशी, निशांत घाटगे आदींनी योगदान दिले. ‘चला एक होऊया, उत्कर्ष साधूया’ हे आपले ब्रीदवाक्य सार्थ ठरवत मानाचिने नामवंतांकडून मार्गदर्शन मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सहभागींनी मानाचिचे मन:पूर्वक आभार मानले.