मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथकं मुंबईत दाखल झालं. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्यात गेल्या दोन वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही. त्यावर नाराजी व्यक्त करीत महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशिल आहे अशी टीका महिला आयोगाच्या सदस्यांनी केली.

आयोग सदस्या चंद्रमुखी देवी यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितले. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ येथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती असे महिला आयोगाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

महिला आयोगाचा पत्ता नाही …
राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. येथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. हे सरकार इतके असंवेदनशील कसं आहे की त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही, जर ते असतं तर महिलांना न्याय मिळाला असता. महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं,” अशा शब्दात महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!