मुंबई – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट, राज्य ग्राहक आयोग व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठया प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बॅंका, वित्तीय संस्था यांच्याकडील आयडिया व्होडाफोन आयडीबीआय बॅक, आदीकडींल बाकी असलेली देयक इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरिता ठेवण्यात आलेली आहेत.
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३६ हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत मुंबई जिल्हयाने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांची जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. जास्तीत जास्त पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत कि. देशमुख यांनी केले आहे.