राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम देशात प्रभावी पध्दतीने राबविणार : – आय.ए.कुंदन
विद्यार्थ्यांसाठी बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवेचा शुभारंभ
मुंबई : भारत सरकारने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरु केला असून या कार्यक्रमाची योग्य पध्दतीने महापालिकेने अंमलबजावणी करावी व हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यासारखे कार्य करावे असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त आय.ए.कुंदन यांनी केले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत पालिकेच्या शाळांमध्ये १ ली ते १० वी तसेच बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आय.ए.कुंदन तसेच समाजवादी पक्षाचे गटनेते तथा स्थानिक नगरसेवक रईस शेख यांच्या हस्ते मुहम्मद उमर रज्जाब मनपा ऊर्द शाळा, मदनपूरा रोड, भायखळा (पश्चिम) येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन विभागाचा असून याचे उदिष्ट विद्यार्थ्यांमधील जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, व्यंग,अपंगत्व, मानसिक व शारीरिक विकासात्मक विलंब यासह इतर आजार याचे वेळेवर निदान करुन योग्य ती उपचार करणे आहे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्याचा हा कार्यक्रम स्त्तुत्य असल्याचे आय.ए.कुंदन यांनी यावेळी सांगितले. समाजवादी पक्षाचे गटनेते श्री. रईस शेख यांनी सांगितले की, महापालिकेच्या आरोग्य विभागात व शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये गरजू व गरीब मुले अधिक असतात. या सामान्य लोकांना आरोग्य सेवा योग्य पध्दतीने राबविण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमासारख्या उपक्रमाची मदतच होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये नियोजनबध्द पध्दतीने अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी प्रशासनास आवाहन केले. तसेच नागपाडा, मदनपुरा भागातील नागरिकांना उत्तम प्रकारची आरोग्य सेवा मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने नायर रुग्णालय अधिक सुसज्ज करावे असेही श्री. रईस शेख यांनी आवाहन केले.
मोठया रूग्णालयात विद्याथ्र्यांसाठी मदत केंद्र
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या तपासणीमध्ये एखादया विद्यार्थ्यांमध्ये जीवनसत्वाचा अभाव असल्यास त्याचे पुढील निराकरण महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागानेही हा उपक्रम सामाजिक भावनेने व कर्त्यव्यांने राबवावे, असेही कुंदन यांनी सांगितले. हा उपक्रम राबवित असताना महापालिकेच्या मोठया रुग्णालयात महापालिकेच्या विद्यार्थ्यांसांठी स्वतंत्र मदत केंद्र स्थापन करण्याचे निर्देशही कुंदन यांनी संबंधीत अधिका-यांना दिले. यासाठी स्वतंत्र असे पथक तैनात करण्यात येणार असून, महापालिकेच्या शाळांत गरीब गरजू व झोपडपटी भागातील मुले मोठया प्रमाणात शिकत असल्याने कार्यक्रमाचा सर्वांधिक लाभ महापालिकेच्या शाळानांच होणार आहे.
विद्याथ्यांच्या तपासणीसाठी ३१ पथक
उपायुक्त सुनिल धामणे यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत ३१ तपासणी पथक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकामार्फत तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही आरोग्य विषयक समस्या असतील तर पुढील उपचार करणे गरजेचे असल्यास त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल. या पथकामध्ये एक पुरुष वैद्यकिय अधिकारी व एक स्त्री वैद्यकिय अधिकारी आणि एक सहाय्यक आरोग्य परिचारिका व एक औषध निर्माता यांचा समावेश असणार आहे. याप्रसंगी ई विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्र.) साहेबराव गायकवाड, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पदमजा केसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपशिक्षणाधिकारी अर्चना नांदेडकर हे उपस्थित होते.