मुंबई : शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. मातोश्रीला विचारल्याशिवाय त्यांना एकाही फाईलवर सही करता येत नाहीत असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र शिंदेच्या नाराजीचे पिल्लू सोडून राणे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण करीत आहेत का ? कि खरचं एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत ? अशी चर्चा आता रंगली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रासुरू आहे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी शिवसेनेवर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे हे नावापुरते मंत्री राहिले आहेत. मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर ते सही करू शकत नाहीत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. मी त्यांना फोन करणार आहे जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे असा दावा राणे यांनी केला .
राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद अधिक वाढला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्याविषयी त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडत नाही, असं ते म्हणाले. मनसे आणि भाजपा मैत्री झाली पाहिजे. ही युती झाली तर त्याचा आनंदच असेल, असंही ते म्हणाले.

राणें शिवसैनिकांना साद घालताहेत का ?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून सुरू झाली. मुंबईतील शिवसेनेचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात राणे यांची यात्रा निघाली. विशेष म्हणजे यात्रेच्या पहिल्याच दिवशी राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यामुळे शिवसेना विरूद्ध नारायण राणे यांच्यामधला राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. शिवसेनेत ३९ वर्षे काम करून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना विरूद्ध नारायण राणे हा संघर्ष सुरू आहे. नारायण राणे आणि शिवसेनेचा संघर्ष जुनाच आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांचा सन्मान राखीत खासदार बनवले. आता मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. त्याची तयारी आतापासूनच दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याविषयी राणे यांनी मोठं वक्तव्य केल्याने राणे हे शिवसैनिकांना साद घालत आहे का ? अशीही चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुक जिंकण्यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ऐन निवडणुकीत नारायण राणे विरूध्द शिवसेना हा सामना कसा रंगतो हेच पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!