दारूच्या दुकानांवर महान व्यक्ती आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही

मुंबई, दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या तरतुदीत 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *