नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना समष्टी पुरस्कार
– नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारीला 
– जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये रंगणार ढसाळ लिटरेचर फेस्टिवल

मुंबई:- पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रंगणार आहे. यावर्षी ढसाळ स्मृती समष्टी पुरस्काराने दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना सन्मानित केले जाणार आहे तर समष्टीचा विशेष गोलपिठा युवा पुरस्कार कवी सुदाम राठोड यांना प्रदान केला जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता अभिनेत्री स्वरा भास्कर, लेखक किरण नगरकर, पत्रकार मंदार फणसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ढसाळ लिटरेचर फेस्टिवल अंतर्गत होणाऱ्या या समारोहाची जय्यत तयारी सुरु असून या कार्यक्रमामध्ये अभिनेता झीशान अय्युब, रसिका आगाशे यांच्यासह अनेक आघाडीचे कलावंत आपली कला सादर करणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे संचालन दीक्षा शेख ह्या करणार आहेत.

सकाळच्या सत्रात सविता प्रशांत यांची मसणवाटा तर सुरज मौर्य यांच्या सायकल या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग होणार आहे. यानंतर मीनाक्षी राठोड यांच्या बंजारा होळीचे तर कैलास वाघमारे यांच्या वगनाट्याचे प्रस्तुतीकरण होणार आहे. दुपारच्या सत्रात पँथर चळवळीचे बदलते स्वरूप या विषयावर आतिश बनसोडे, वैद्यकीय क्षेत्र आणि उच्च शिक्षण या विषयावर डॉ. आकाश वाघमारे संवाद साधतील. तर आगामी काळातील स्त्री नेतृत्वार नेहाली व सुषमा संवाद साधतील. अकेडमीक क्षेत्रातील बाबासाहेब या विषयावर रिया सिंग संवाद साधतील तर राहुल प्रधान हे नव्या नेतृत्वावर भाष्य करणार आहेत.  कार्यक्रमात दुपारी तीन वाजता रसिका आगाशे दिग्दर्शित सत् भाषे रैदास या नाटकाचे मंचन होणार आहे. यानंतर रवींद्र आंबेकर यांच्यासह मान्यवरांचे एका तासाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५.१५ ला आकांशा गाडे या नामदेव ढसाळ यांच्या हाडकी हडवळा यावर एकपात्री प्रयोग करणार आहेत. यांनतर झीशान अय्युब व रसिका आगाशे विद्रोही कवितांचे वाचन करणार आहेत. सोबतच अभिनेत्री स्वरा भास्कर, पत्रकार निरंजन टकले, मंदार फणसे हे देखील कवितांचे वाचन करणार आहेत. अभिनेता चरण जाधव याच्या कोलाजची प्रस्तुती देखील यावेळी होणार आहे. चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, उदय मोहिते, सोनाल वानखेडे, मेघा वानखेडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या कलाप्रकारांचेही सादरीकरण यावेळी होणार आहे. दरम्यान या लिटरेचर फेस्टिव्हल अंतर्गत दिवसभर लाईव्ह पेंटिंग व वेगवेगळ्या कलाप्रकारांचे उस्फुर्त सादरीकरण देखील केले जाणार असल्याची माहिती संयोजन समितीचे डॉ. रेवत कानिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!