ढसाळांच्या कवितेत जगण्याची अद्भुत नशा : नागराज मंजुळे
नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना समष्टी पुरस्कार; सुदाम राठोड यांना युवा गोलपिठा पुरस्कार प्रदान
मुंबई:- नामदेव ढसाळ यांच्या रचना ह्या आपल्या जगण्यातल्या जवळच्या गोष्टींशी सबंधित होत्या. त्यांच्या कवितेने प्रेमात पडण्याचा अनुभव यायचा तसेच त्यांच्या कवितेत जगण्याची वेगळी नशा होती असे प्रतिपादन कवी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रंगला. यावर्षी ढसाळ स्मृती समष्टी पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान केला गेला तर पद्मश्री सुधारक ओलवे यांना २०१७ च्या समष्टी पुरस्काराने सन्मानित केले गेले. सन्मानचिन्ह व रोख २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात समष्टीचा विशेष गोलपिठा युवा पुरस्कार कवी सुदाम राठोड यांना प्रदान केला गेला. ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते पुरस्कार्थिंचा गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर अभिनेत्री स्वरा भास्कर, जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, राजश्री देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी ढसाळ लिटरेचर फेस्टिवल अंतर्गत झालेल्या या समारोहात अनेक कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या संपूर्ण सोहळ्याचे संचालन दिशा शेख यांनी केले.
नागराज मंजुळे यावेळी म्हणाले की, ढसाळांच्या कविता वाचणे आयुष्यातील संस्मरणीय दिवस होते. ढसाळांच्या कवितांमध्ये अश्लील शब्द असल्याने त्यांच्या रचनांना वेगळ्या पठडीतले समजले जायचे मात्र त्यांच्या साहित्यात वंचितांची भाषा होती. त्यांचा विचार सुंदर होता, असे मंजुळे म्हणाले. मंजुळे यावेळी म्हणाले की, मला बोलू दिल जात नाही. मात्र मला बोलायचंय असे म्हणत आपण बोलल पाहिजे असे टे म्हणाले. विद्रोही कविता, नाटक लिहिणे खरतर अभिमानाची गोष्ट नाही, हा अन्याय कधी संपणार आहे. सगळ व्यवस्थित झाल्यावरच हे लिहिणे आणि बोलणे बंद करू असे ते म्हणाले. अजूनही जातीवरून लोकं ओळखली जातात, जात सामुहिकरीत्या एकदाच सोडून द्या. भीमा कोरेगाव घटनेचे फार दुख होतंय, असे सांगताना देशाबद्दल प्रेम वाटल पाहिजे. देशाबद्दल प्रेम म्हणजे माणसाबद्दल प्रेम वाटल पाहिजे असे मंजुळे म्हणाले. तसेच विद्रोह म्हणजे आकांडतांडव नव्हे. या कोलाहालात कुणीतरी शांतपणे भूमिका मांडतोय तर तोही विद्रोह आहे असे त्यांनी सांगितले. मी माझ्या कलाकृतीत आताच्या गोष्टि बोलतो. अश्मयुगातील बोलत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगताना त्यांच्या स्मृतीत केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. क्रांतीचा हा यल्गार शांतीच्या मार्गाने पुढे न्यायचा असल्याचे ते म्हणाले. सुधारक ओलवे यांनी देखील यावेळी ढसाळ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ढसाळ यांच्या जगण्यात एक अनोखी उमेद होती. त्यांच्यासोबत असतांना फोटोग्राफी करताना देखील अनेक अनुभव आल्याचे ते म्हणाले.
सकाळच्या सत्रात सविता प्रशांत यांची मसणवाटा तर सुरज मौर्य यांच्या सायकल या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग झाले. यानंतर मीनाक्षी राठोड यांच्या बंजारा होळीचे तर कैलास वाघमारे यांच्या वगनाट्याच्या प्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. रसिका आगाशे दिग्दर्शित सत् भाषे रैदास या नाटकाच्या प्रस्तुतीने उपस्थितांना खिळवून ठेवले. यावेळी अभिनेता झीशान अय्युब आणि रसिका आगाशे यांनी विरोधी कवितांचे वाचन केले. तर अभिनेत्री स्वरा भास्करने देखील नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन यावेळी केले. चरण जाधव यांनी हलगीच्या सुरात नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे प्रस्तुतीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, उदय मोहिते, सोनल वानखेडे, मेघा वानखेडे यांच्यासह अनेक कलाकारांनी चित्र, पेंटिंग आणि कोलाजच्या माध्यमांतून ढसाळ यांच्या स्मृतीला उजाळा दिला. दुपारी ‘माध्यमांची विश्वासार्हता’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पत्रकार रवींद्र आंबेकर, निरंजन टकले, आश्विनी सातव-डोके, विजय गायकवाड, निलेश झालटे यांनी सहभाग घेऊन माध्यमाच्या सद्यस्थिती आणि भविष्यावर चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार काही समष्टीसाठीच्या संपूर्ण टीमने प्रयत्न केले.
Remembering again Namdev Dhasalji !