मुन्ना यादव नागरपूरात फार्महाऊसवर दडून बसलाय
विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
नागपूर : नागरपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केला. मुन्ना यादवविरूद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणी विखे पाटील यांनी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुन्ना यादवचा नागपूर पोलिस रात्रं-दिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितले जाते आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसमध्ये दडून बसला आहे. ते पुढे म्हणाले की, मुन्ना यादव नेमका कुठे आहे, याची माहिती सभागृहात जाहीर झाल्यामुळे पोलिस तिथे पोहचेपर्यंत तो तिथून फरार झालेला असेल. त्यामुळे पोलिसांनी आता नागपुरातील भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. मागील आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. समाजात ‘मुन्ना यादव’ अचानक घडत नाहीत आणि स्वतःहून घडत नाहीत. या सरकारने क्षुल्लक राजकीय हेतुंसाठी गुंडांना पाठीशी घालण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे समाजात ‘मुन्ना यादव’ निर्माण होऊ लागले आहे. नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.