गडकरी- फडणवीस यांच्या हस्ते नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील विविध प्रकल्पाचे भूमिपूजन
मुंबई ( अजय निक्ते ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिज आणि अंडरपाससह उज्वलनगर ते मनीषनगरला जोडणाऱ्या उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन केले. हा मार्ग १ .६० किमी लांबीचा राहणार असून त्यासाठी १३० कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १० गावांसाठी नागपूर पेरी अर्बन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन सुद्धा यावेळी झाले. २३२.७५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, त्याचा ३.५ लाख नागरिकांना लाभ होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी यावेळी बेलतरोडी पोलिस स्टेशनचे डिजिटल उदघाटनही केले.
याच कार्यक्रमात स्वच्छ शाळांना तसेच ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो?’ या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ वर्षाच्या कालावधीत पेयजल योजनेचे काम पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मनिषनगर आरओबीसाठी काम करणाऱ्या संपूर्ण टिमचे अभिनंदन केले. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे विमानतळ तयार करण्यासाठी राज्य सरकार काम करते आहे. त्यात कार्गो हबचीही सुविधा असेल. नागपूर येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी ७५० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २०० कोटींच्या रुपयांच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.