नागपूर, दि.१७:- नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन , पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
नागपूर मधील बाजारगाव रविवारी स्फोटाने हादरले. बाजारगावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन यात नऊ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. या घटनेने नागपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सोलर ग्रुपद्वारे संचालित इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारा देशातील एक मोठी कंपनी आहे. आजघडीला येथून भारतीय लष्कर, नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचे उत्पादन होते. तसेच या कंपनीद्वारे भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात येते.
ऑगस्ट महिन्यात इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीद्वारे उत्पादित केलेल्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावताना आग लागली होती. त्यावेळी या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी होता. त्या घटनेला पाच महिने लोटत नाही तोच रविवारी हा मोठा स्फोट झाला आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी : विजय वडेट्टीवार
नागपुरातील स्फोटातील प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अश्या घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
००००