नागोठण्यात डॉक्टरांअभावी रूग्णांचे हाल : मृतदेहांचीही होतेय हेळसांड 
नागोठणे –  (महेंद्र म्हात्रे)  – नागोठणे आरोग्य केंद्रात गेल्या वर्षभरापासून एमबीबीएस दर्जाच्या वैद्यकीय अधिका-याची जागा रिक्त असतानाच बीएएमएस दर्जाचे  डॉक्टरही १५ दिवसाच्या  रजेवर गेल्याने  डॉक्टरांअभावी रूग्ण वा-यावर आहेत.   आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने उपचाराविनाच रूग्णांना माघारी फिरावे लागत आहे अशीच अवस्था निर्माण झालीय. त्यामुळे इथल्या आरोग्य सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. रोहे तालुक्यात १३५ पैकी अवघे ६२ डॉक्टर आहेत.  त्यामुळे रूग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 नागोठणे शहर मुंबई – गोवा महामार्गस्थित असून प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गावरच वसले आहे. महामार्गावर नेहमी अपघात होत असल्याने डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना येथे नेहमी सतर्क राहावे लागत असते. परिसरात अनेक गावे तसेच वाड्या असल्याने येथील नागरिक उपचारासाठी याच केंद्रात येत असल्याने आरोग्य केंद्र सायंकाळपर्यंत गजबलेले असते. गेल्या  सात वर्षे सलग सेवा देणारे एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.जी. वडजे  यांनी सरकारी सेवेचा राजीनामा दिल्यानंतर एक वर्षापाूसन ही जागा रिक्त आहे.  ओपीडीतील  रूग्णांना तपासणीसाठी डॉक्टर नसल्यास रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे व त्यामुळे गोरगरीब रूग्णांना आर्थिक  भूर्दंड सहन  सोसावा लागत असतो. सध्या या केंद्रात बीएएमएस दर्जाचे डॉ नेटके  हेच एकमेव डॉक्टर रूग्णांना आधार बनले आहेत. पण ते सुध्दा  पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. ५ नोव्हेंबरला सेवेत हजर होणार आहेत. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉक्टरांची कमतरता असल्याचे मान्य करीत   वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  सांगितले. राज्याच्या आरोग्य संचालकांकडून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडे हे डॉक्टर वर्ग होत असल्याने तेथून डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे यांनी महत्वाच्या  आरोग्य केंद्रात लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी निश्चितच लक्ष घातले जाईल असे सांगितले.
 अशी करावी लागते मृतदेहांना प्रतिक्षा ..
रोहे तालुक्यातील तीनसह जिल्ह्यात एकूण ५२ प्रा. आरोग्य केंद्र आहेत.जिल्ह्यात एकूण १३५ डॉक्टरांची नेमणूक असणे गरजेचे असले, तरी जिल्ह्यात फक्त ६२ एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरच उपलब्ध आहेत. अपघात किंवा अनैसर्गिक कारणाने काही मृत्यू घडल्यास सरकारी नियमानुसार त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे लागते. शवविच्छेदन करण्याचा अधिकार फक्त एमबीबीएस दर्जाच्या डॉक्टरलाच आहे. सध्या या केंद्रात  एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारीच नसल्याने पाली किंवा रोहे येथून  डॉक्टरला बोलवावे लागते. डॉक्टर येईपर्यत  आठ ते दहा तासाचा कालावधी जातो तोपर्यंत मृतदेह तसाच ठेवावा लागतो. मंगळवारी रात्री येथे रेल्वेने धडक दिल्याने एका आदिवासी व्यक्तीचा मृतदेह येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. या कामासाठी बाहेरून डॉक्टर आणावा लागला. बुधवारी दुपारपर्यंत मृताच्या नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले होते. तर, त्याच दिवशी सायंकाळी एका लहान मुलाला दुचाकीने धडक दिल्याने त्याचा अंत झाला होता. या कामासाठी पुन्हा डॉक्टरांची गरज भासल्याने नागोठणे पोलिसांनी पुढाकार घेत स्वतः पाली येथून डॉक्टर आणल्याने या मुलाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले होते. महामार्गावर असणाऱ्या या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे मात्र सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे याकडे कानाडोळा झाल्याचेच दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!