मुंबईतील हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या वाढीव एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती

आमदार आशिष शेलार यांनी केली होती महसूलमंत्र्याकडे मागणी

मुंबई, : मुंबईतील 22 हजार गृहनिर्माण सोसायट्या आणि अन्य बांधकामांच्या जागांना वाढीव अकृषिक कर भरण्या संदर्भात महसूल विभागाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसीना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिलीय. या नोटीसीवरून मुंबईकरांमधे नाराजीचा सूर होता त्यामुळे या नोटीसांना स्थगिती देण्याची मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी महसूल मंत्र्यांकडे केली होती.

मुंबईसह राज्यातील नागरी भागातील रहिवासी क्षेत्र असलेल्या जमिनींवर असणार्‍या गृहनिर्माण सोसायट्यांसह अन्य हजारो इमारतींना 2008 पासूनचा अकृषिक कर आकारण्यात आला असून त्यावर पुन्हा दंड ही आकारण्यात आल्याने याचा अचानक मोठा बोजा रहिवाशांवर आला आहे. त्यामुळे रहिवाशांमधे प्रचंड नाराजी होती. मुंबईतील बहूतांश सोसायट्यांना अशा नोटीस आल्या असून वांद्रे विधानसभा मतदारसंघात अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या असून सालसेट को. हौ. सोसायटी, सेंट सॅबेस्टीन हौ. सो. या सारख्या मोठ्या सोयट्यांसह, बांद्रा जिमखाना, खाजगी घर मालक व अन्य मालमत्तांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या रहिवाशांनी आमदार आशिष शेलार यांची या प्रकरणी भेट घेऊन निवेदन दिले होते. दरम्यान, शेलार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अकृषिक कर आकारणी अवाजवी दराने असल्याची बाब मंत्र्यांच्या त्यांनी लक्षात आणून दिली. यावर निर्णय देताना महसूल मंत्र्यांनी या नोटीसांना स्थगिती दिली. तसेच याबाबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश ही महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *