विधानपरिषदेचे माजी उप सभापती वसंतराव डावखरे यांचेपाठोपाठ माजी सभापती प्रा. ना.स.फरांदेही गेले… सन २०१८ नववर्षाचा प्रारंभ अशा दु:खद घटनांनी व्हावा हे खरोखरच क्लेशदायक. ज्येष्ठांचे सभागृह अशी ओळख असलेल्या विधानपरिषदेमध्ये १९८६ साली फरांदे सरांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून प्रवेश केला. विधानपरिषद सदस्य, १९९४ ते १९९८ उपसभापती आणि १९९८ ते २००४ या कालावधीत सभापती असा त्यांच्या कारकीर्दीचा प्रवास संसदीय लोकशाहीच्या अभ्यासकांसाठी अनेक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. एमए मराठी आणि संस्कृतमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या फरांदे सरांचे आवडीचे क्षेत्र म्हणजे अध्यापन. म्हणूनच तर ते प्राध्यापकी आणि प्राध्यापकांच्या आंदोलन कार्यात प्रारंभी रमले. आणीबाणी विरोधी आंदोलनानंतर जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणाकडे ओढले गेले.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे सभागृह खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. घटनात्मक तरतुदीनुसार विधानसभा ठरावाद्वारे नव्याने विधानपरिषद हे सभागृह निर्माणही करू शकते आणि अस्तित्वात असलेले सभागृह ठरावाद्वारे बरखास्तही करू शकते. दक्षिणेच्या राज्यात असे अनेकदा घडले आहे. महाराष्ट्रात मात्र अस्तित्वात आल्यापासून, या सभागृहाची उपयुक्तता लक्षात घेता, हे सभागृह कधीही बरखास्त झालेले नाही. फरांदे सरांचे यासंदर्भातील विश्लेषण त्यांच्या सुंदर मराठीत ऐकणे हा खरोखरच संस्मरणीय अनुभव असायचा. प्राध्यापकीपेशामुळे विषयाची अत्यंत सुस्पष्ट मांडणी आणि संस्कृतोदभव मराठी शब्दांचा नेमका वापर श्रोत्यांना बांधून ठेवायचा. अध्यापन आणि शेती या आवडीच्या क्षेत्रांतील संदर्भ त्यांच्या व्याख्यानात नेहमी यायचे.

स्वभाव शीघ्रकोपीत्वाकडे झुकलेला असला तरी निवेदनशैलीत अनेकदा नर्म विनोदही असायचा. सभागृह कामकाजाचे संचालन करतांना त्यांचे व्यक्तित्व दोन्ही बाजूंना आश्वासक वाटायचे. मी विधानपरिषद कामकाजाचे पत्रकार म्हणून वार्तांकन करीत असतांनाचा प्रसंग. त्यादिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर खूप औचित्याचे मुद्दे उपस्थित व्हायला लागले. एक झाला की दुसरा हात लगेच वर असायचा. शेवटी सभापतीपदावरून उठून उभे राहत फरांदे सर मिष्किलपणे म्हणाले- आज वारंवार इतके ‘औचित्याचे मुद्दे उपस्थित होत आहेत…मला सांगा आपले कामकाज खरंच इतक्या ‘अनुचित’ पध्दतीने सुरू आहे का…?’ यानंतर मात्र कोणाचा हात वर झाला नाही !

संसदेमध्ये अर्थसंकल्प चिकित्सेसंदर्भात विभाग संलग्न स्थायी समित्यांचे कार्य उत्तमप्रकारे चालते. या समित्यांद्वारे खातेनिहाय खर्चाची, योजनांची सखोल चिकित्सा होते, समित्या शिफारसी करतात, त्याअनुरूप कार्यवाही देखील होते. महाराष्ट्र विधीमंडळानेही, नियमित समित्यांच्या बरोबरीने, या पध्दतीचा अंगीकार करावा अशी सभापतीपदी असतांना फरांदे सरांची आग्रही भूमिका होती. विधानसभा अध्यक्षपदी तेव्हा  अरुणभाई गुजराथी हे होते. दोहोंच्या प्रयत्नाने अशा एकूण १५ समित्या स्थापनही झाल्या. १० समित्यांचे प्रमुखपद विधानसभा सदस्यांना देण्यात आले. माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्याकडेही एका विभाग समितीचे अध्यक्षपद सुपुर्द करण्यात आले. अर्थसंकल्पानंतर अशा प्रकारे या समित्यांनी एक वर्ष काम केले पण दुसऱ्यावर्षानंतर ही पध्दत बंद करण्यात आली…

विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. फरांदे सर आणि अरुणभा गुजराथी यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्याच कार्यकाळात एका विशेष समारंभात हे तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात झळकले. विधानपरिषदेचे सभापतीपद भुषविणारे वि.स.पागे, रा.सू.गवई, जयंतराव टिळक या परंपरेचे आपण मानकरी आहोत याचे कृतज्ञ स्मरण त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे. आपल्याकडे ‘Once a Speaker always a Speaker’ हा संसदीय लोकशाहीतील संकेत रूढ नाही. त्यामुळे पीठासीन अधिकारीपदावर विराजमान झाल्यावर पक्षीय राजकारणापासून दूर व्हावे अशी अपेक्षा बाळगली जाते परंतु पुन्हा निवडून यायचे असेल तर पक्षाकडे जाणे अपरिहार्य असते. सभापतीपद सांभाळतांना फरांदे सरांनी हा संकेत कटाक्षाने पाळला. पत्रकार म्हणून कार्यरत असतांनाचा आणखी एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. १९९९ ते २००४ ‘एनडीए’ कार्यकाळात पंढरपूर येथे तत्कालिन पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. फरांदे सर तेव्हा सभापती होते. त्यांना अटलजींना भेटायचे तर होते पण या सभेचा भाग मात्र व्हायचे नव्हते. अशावेळी व्यासपीठाच्या मागील बाजूस ते सभा संपेपर्यंत थांबले आणि पंतप्रधान महोदय व्यासपीठारून खाली आल्यानंतर सभापती महोदय त्यांच्याभेटीसाठी पुढे आले.  अधिवेशनकाळात प्रश्नोत्तराच्या छापील यादीत त्या-त्या विभागाची ५० ते ६० प्रश्नोत्तरे असतात. प्रश्नोत्तराच्या एका तासाच जास्तीत जास्त ८ ते १० प्रश्न प्रत्यक्ष चर्चेला येतात. उर्वरित प्रश्नांमध्ये अनेक महत्वाचे विषय चर्चेविना राहून जातात. फरांदे सरांनी प्रश्नोत्तराच्या यादीतील महत्वाचा असा एक प्रश्न निवडून तो शेवटच्या पाच मिनिटासाठी चर्चेला घेण्याची प्रथा सुरू केली होती. यामुळे व्यापक समाजहिताचे अनेक प्रश्न (अनुक्रमांक ८ ते १० व्यतिरिक्त) सभागृहात प्रत्यक्ष चर्चेसाठी येवू शकले.
सभापतीपदाची कारकीर्द २००४ मध्ये संपल्यानंतर फरांदे सर राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जन्म वाई , शिक्षण पुणे-कोल्हापूर, प्राध्यापकी धुळ्यात, कोपरगावात, विधानपरिषद मतदारसंघ नाशिक विभाग पदवीधर आणि निवृत्तीनंतरचे वास्तव्य पुणे. सरांच्या निधनानंतर आता हा प्रवास संपला आहे. राजकारणातील धनाढ्यांचा मुक्तसंचार आता रुढाचार होत असतांना विव्दत्तेच्या आधारे विधानमंडळाच्या इतिहासावर स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या फरांदे सरांचे वेगळेपण संसदीय लोकशाहीच्या अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहिल. सरांना भावपूर्ण श्रध्दांजली…

लेखक :  निलेश मदाने,

जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानसभा अध्यक्ष यांचे विशेष कार्य अधिकारी विधान भवन, मुंबई.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *