गेल्या १०० वर्षांत जर्मन भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रचंड संशोधन आणि विकास झालेला आहे. अत्यंत प्रगत आणि एकात्मिक संवादात्मक पद्धती आणि तंत्रज्ञान याचा वापर करून परभाषा शिकवण्यात त्यांनी जगात सर्वत्रच आघाडी घेतली आहे. भारतीय भाषांच्या उत्तम अध्यापनासाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाने अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ यांना एकत्र करून अन्यभाषकांना मराठी अध्यापनाचा प्रकल्प ‘मायमराठी’ या नावाने सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे स्वरूप एकूण १ ते ६ पातळ्यांवरील अभ्यासक्रम तयार करणे अशा स्वरुपाचे आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या ध्येयधोरणानुसार मराठी भाषेचा ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून विकास करणे हे मराठी विकास संस्थेचे ध्येय आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या एकूण २० उद्दिष्टांपैकी ९ वे उद्दिष्ट “अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृती यांच्याबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे”, संस्थेच्या १५ व्या उद्दिष्टाप्रमाणे “संस्थेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मराठीच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या विस्तार सेवा देणे, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखणे, परस्पर सहकार्याने पाठ्यक्रम, पुस्तकनिर्मिती व इलेक्ट्रॉनिक साहित्यनिर्मिती करणे” तर २० व्या उद्दिष्टाप्रमाणे “भाषिक पाया सुधारण्यासाठी अध्ययनसामग्री निर्माण करणे, प्रशिक्षणाची उपकरणे विकसित करणे व अन्य आवश्यक उपक्रम राबविणे” इ. उद्दिष्टे ठेवून ह्या प्रकल्पाची योग्य आखणी करण्याचे नक्की करण्यात आले. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या ‘माय मराठी’ प्रकल्पास फक्त अर्थसहाय्य न करता संयुक्त विद्यमाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांच्यामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
आधुनिक काळानुसार अभ्यासक्रम
या प्रकल्पातून आधुनिक काळानुसार हे सर्व अभ्यासक्रम अन्यभाषिकांना मराठी शिकविण्यासाठी एकूण ६ म्हणजे उर्वरित ५ पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाठ्यपुस्तके, स्वाध्याय-पुस्तके,लहान शब्दसंग्रह आणि संपादित / निर्मित दृकश्राव्य सामग्री –सीडी / डीव्हीडी इत्यादी – ऑफलाइन आणि ऑनलाइन सामग्रीचा समावेश आहे. पातळी १ ते ६ मध्ये अन्य भाषिकांना मराठी कसे शिकवावयाचे याबाबत टप्प्याटप्याने संवाद आणि व्याकरण यांचा विचार करुन अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पातळी दोन चे काम पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पांतर्गत काही लघू अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये परिचारिका, टॅक्सी-रिक्षाचालक, शासकीय अधिकारी आणि बॅंकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. आधुनिक काळानुसार हे सर्व अभ्यासक्रम आंतरजालीय/संगणकधारित/चलभाष संचावर आधारित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी अन्ड्रॉइड ॲपची देखील निर्मिती करुन ती मुक्तस्रोत स्वरुपात सर्वसामान्य अमराठी भाषिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तर मराठी शिकण्याची आवड निर्माण : तावडे
महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्या अमराठी भाषिकांना शास्त्रशुद्ध रीतीने मराठी भाषा शिकवण्यासाठी खास तयार केलेला अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या क्षेत्रात आजवर विविध संस्थांनी प्रयोग केलेले आहेत. मात्र त्यात कालानुरुप बदल होणे गरजेचे होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाचा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेला प्राप्त झाल्यावर या प्रस्तावाचा सांगोपांग विचार करुनच हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. अमराठी भाषिकांना मराठी शिकण्याची आवड निर्माण होईल असेही तावडे म्हणाले.