देशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा – आ. प्रविण दरेकर
मागाठाणेत कार्यकर्ता मेळाव्याला उदंड प्रतिसाद
मुंबई, 23 मार्च – भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे. याची सुरुवात उत्तर-मुंबईपासून करणार आहोत. उत्तर- मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, ही माझी गॅरंटी आहे, असे आश्वासन उत्तर-मुंबईतील भाजपा-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांनी दिले आहे.
तर संपूर्ण देशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा असल्याचे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ते मागाठाणे विधानसभेतर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी मा. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडल अध्यक्ष दिलीप उपाध्याय, महिला अध्यक्षा रश्मी भोसले, ऍड. शिवाजीराव चोगले, कृष्णकांत दरेकर, नगरसेविका प्रीतम पंडागळे, चित्रपट आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परुळेकर, आरपीआयचे रमेश गायकवाड यांसह मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पुरुष आणि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी ‘अब की बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार’, ‘जय श्री राम’, असा जयघोष केला.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोयल म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आधार, मेहनतीवर, आशीर्वादामुळे अनेक वर्षाच्या तपस्येनंतर भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ७० वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, अनेक समस्या झेलल्या, संकटांना सामोरे गेले मात्र भाजपा हा असा पक्ष आहे ज्याचे कार्यकर्ते संघर्ष करत राहिले आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे देशच नाही तर संपूर्ण जग बघत आहे.
त्यांच्या नेतृत्वाने भारतीय नागरिकांच्या जीवनात उत्साह, आत्मविश्वास निर्माण झालाय. येणाऱ्या काळात प्रत्येक गरीबाच्या जीवनात बदल होणार. प्रत्येक जातीधर्माच्या व्यक्तीला पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये योजनांचा लाभ मिळालाय. आजही देशातील ८० कोटी मध्यमवर्गीयांना मोफत रेशन धान्य मिळत आहे. देशातील १४० कोटी जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट आहे.
काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही
कार्यकर्त्यांना संबोधित करताना पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांना लॉन्च करतो, पुन्हा लॉन्च करतो मात्र ते ‘रॉकेट’ उडतच नाही. देश चंद्रावर पोहोचला मात्र काँग्रेसचे हे ‘रॉकेट’ असे आहे ते उडतच नाही. फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रती काँग्रेसकडे काहीच योजना नाही.
गोयल पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारताच्या संस्कृतीला, इतिहासाला किती मजबूत वारसा आहे हे दाखवून दिलेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबाच्या कल्याणाचा, या देशातून गरिबी हटविण्याचा, भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
त्यांनी २०४७ पर्यंत भारताने विश्वशक्ती बनून जगाची अर्थव्यवस्था चालवण्याचा संकल्प केलाय. मोदींनी गॅरंटी दिलीय तिसऱ्या टर्मला भारत पाच ट्रिलियन डॉलर पार जाणार आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार. तसेच भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे.
याची सुरुवात उत्तर मुंबईपासून करणार, उत्तर मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, ही माझी गॅरंटी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आम्ही सर्व मिळून योजनावर काम करतोय की मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांना स्लम मुक्त कसे करू शकतो.
ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीतील नेत्यांनी मोदींवर बरीच टीका केली. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून शौचालयाची घोषणा कोण करते म्हटले. पण मोदी शौचालयाचे महत्व जानतात. त्यामुळेच देशात ११ कोटी मोफत शौचालय बनवले गेले. भारताला अजून पुढे जायचे आहे.
भारताला योग्य ठिकाणी नेऊन जागतिक महासत्ता बनवणारा कोणी नेता असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या परिवारातील येथे बसलेला प्रत्येक सदस्याला माहित आहे ‘मोदी है तो मुमकिन है’. त्यांना ताकद देण्याचे काम आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही आवाहनही गोयल यांनी केले.
तत्पूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, पियुष गोयल यांच्या उमेदवारीविषयी उत्तर मुंबईत चांगले आनंदाचे वातावरण आहे, त्याहीपेक्षा मागाठाणेत जास्त आहे. 20 तारखेला लोकसभेच्या निवडणुका आहेत.
पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे लोकप्रिय नेतृत्व ज्यांनी आपल्या देशाचे नाव सातासमद्रापलीकडे नेले त्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठीची ही निवडणूक आहे. संपूर्ण देशात मोदीमय वातावरण झालेय. या उत्तर मुंबईने सातत्याने भाजपाला आशीर्वाद दिलेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान घेण्याचा विक्रमही या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या माध्यमातून केलाय. संपूर्ण देशात उत्तर मुंबईचा जो काही विजय होईल तो नेत्रदीपक असला पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.
दर पाच वर्ष आपल्याला उत्तर मुंबईचे चित्र बदलायचे असेल तर फक्त दोन महिने पियुष गोयल, भाजपासाठी द्या. उत्तर मुंबईचे चित्र आम्ही बदलून दाखवू, असा विश्वास दरेकरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.