मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. फक्त राज्यपालच नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात हा मोर्चा असेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक वाद, शिवाजी महाराजांबद्दल होणारी वक्तव्यं, राज्याबाहेर जाणारे उद्योग अशा विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘सरकार कायदेशीर का बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण राज्यपाल शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांसारख्या अपमान करताहेत. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे. सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान होतोय. फुटिरतेची बीज इथं रोवली जात आहेत. काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय असंही ठाकरे म्हणाले.
राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणार – अजित पवार
८ तारखेला पून्हा सर्वपक्षीय बैठक होणार आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहेाच. आमच्या काही घटक पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिंदे आणि फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. उद्योग महाराष्ट्रातून जात आहेत आणि जे आहेत ते देखील घालवत आहेत असा आरोपही अजित पवार यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना हटवले तरी हा मोर्चा निघणार, असं अजित पवार यांनी सांगितलं.