डोंबिवली : कल्याणच्या पत्रीपूल परिसरात रेल्वे लाईनलगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह गुरूवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली उडाली आहे. जाळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक टिळकनगर पोलिसांनी या इसमाची छायाचित्रे सर्वत्र प्रसारित केली आहेत. आठवडा उलटूनही मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या हत्याकांड प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.

कल्याण पूर्वेकडे पत्रीपूलाच्या जवळ असलेल्या पारिजात बिल्डिंगच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक लगत झुडपांत एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलला पाठवून दिला. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. बहुदा पूर्ववैमनस्यातून वा अनैतिक संबंधातून या इसमाची हत्या करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकऱ्यांनी प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

35 ते 40 वर्षाच्या इसमाचा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटली नसल्याने त्याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. मृताने लाल ठिपके असलेला राखाडी रंगाचा शर्ट आणि स्काय ब्लू रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. कमरेला लोखंडी हूक असलेला चामडी पट्टा आहे. तर वरच्या दातांना सिरॅमिक किंवा मेटलची क्लिप लावलेली दिसून येते. ओळख पटू नये, तसेच विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञातांनी सदर इसमाचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कमरेपासून वरचा भाग जळून विद्रूप झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या इसमाला जाळून ठार मारण्यामागे पूर्ववैमनस्य वा अनैतिक संबंधाचे कारण असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!