डोंंबिवली : दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ भांडणातून येथील तीन जणांनी फुले नगरमधील एका ४४ वर्षाच्या इसमाचा खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह देवीचापाडा येथील खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणातील दोघा आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. सोमनाथ शिंदे (४४) असे मृत इसमाचे नाव आहे. तर त्याला ठार मारणाऱ्या योगेश डोंगरे (४३, मोठागाव) आणि विलन विष्णू टावरे (४१, उमेशनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा मारेकरी दीपक करकडे (मोठागाव) याचाही पोलिस शोध घेत आहेत.
देवीचापाडा खाडी किनारी एका पुरूषाचा मृतदेह खाडी किनारी तरंगत असल्याची माहिती देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मयताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा होत्या.
पोलिसांनी तातडीने तपास करून दोघा आरोपींना डोंबिवलीतील उमेशनगर आणि मोठागाव भागातून अटक केली. मृत आणि आरोपी एकमेकांचे परिचित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला ठार मारले. त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.