डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्राचे प्रभारी अधिकारी तथा सहायक आयुक्त पदाचा कार्यभार मुरारी बबन जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सुहास गुप्ते हे रजेवर आल्याने जोशी यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला असून, आज त्यांनी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. स्वच्छ चारित्र्याचा, अभ्यासू अधिकारी म्हणून जोशी यांची प्रतिमा असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

डोंबिवलीचे स्थानिक भूमिपुत्र असलेले मुरारी जोशी हे पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात राहतात. त्यामुळे डोंबिवलीच्या प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण आहे. महापालिकेच्या कर विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करीत आहेत. जोशी येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. विशेष म्हणजे जोशी यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे.

शहरातील साफ सफाई आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याचे जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. तसेच पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी धुळीचे साम्राज्य आहे. हा प्रभाग धुळ मुक्त करण्याचा आपला मानस जोशी यांनी व्यक्त केला. आपल्याला कमी कालावधी मिळालेला असला तरी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

गेल्या 30 वर्षात जोशी यांनी अनधिकृत विभाग, फेरीवाला पथक प्रमुख आणि वरिष्ठ लिपिक म्हणून पालिकेमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!