मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर होणार आहे.
महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरु केली आहे.
तसंच, राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिकेला 31 मे रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहे. मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहाणार आहे. मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.