स्थायी समितीचे माजी सभापती वामन म्हात्रे यांची राज्य शासनाकडे चौकशीची मागणी
डोंबिवली : डोंबिवलीत एका बिल्डरने पालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पालिकेची परवानगी नसतानाही पार्किंगची जागा हटवून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यात आले ओहत. त्यामुळे पालिकेची फसवणूक करणा-या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास विभाग आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पश्चिमेतील महाराष्ट्रनगर येथील गावदेवी परिसरातील जुना सर्व्हे क्रमांक १६१/४ व नवीन सर्व्हे क्र ७९/४ येथे पालिकेचा ४० वर्षापासूनचा रस्ता ठक्कर बिल्डर याने बांधकामामध्ये घेऊन सात मजली टॉवर उभा केल्याची तक्रार माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी केली आहे. प्रशासनाची दिशाभूल करून ही इमारत उभी केली आहे. बांधकाम परवानगीनुसार मंजूर नकाशात पाकिँग असतानाही ते हटवून व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. तसेच या इमारतीसाठी बिल्डरने अधिका-यांना हाताशी धरून नळजोडणी घेतली आहे. पालिकेने कोणत्या आधारे नळजोडणी दिली याची चौकशी करावी. पालिकेचे लाखो रूपये नुकसान करणा-या बिल्डरवर व अधिका-यांवर कारवाई करावी तसेच सदर बिल्डरला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये अशी मागणी म्हात्रे यांनी तक्रारीत केली आहे. त्यामुळे पालिकेकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष वेधले आहे.