कल्याण :- महापालिका क्षेत्रात साफसफाईच्या कामाचा पाहाणी दौरा करत असताना पालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या धर्मेंद्र सोनावणे या चतुर्थ श्रेणी कंत्राटी कामगाराला पालिका आयुक्त डॉ . इंदुराणी जाखड यांनी चौकशी अंती अखेर आज निलंबित केल्याची माहिती पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे.
कडोमपा आयुक्त डॉ . इंदुराणी जाखड या २० डिसेंबर ला “अ” प्रभाग क्षेत्र परिसरातील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात असतानाच, धर्मेंद्र सोनावणे कंत्राटी वाहनचालक हा आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात आयुक्तांच्या आदेशानुसार त्या कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली होती. कंत्राटी वाहनचालकाच्या गैरवर्तनाबाबत त्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला होता. सोनावणे यांनी केलेला खुलासा आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये विसंगती आढळून आल्याने, त्याचा खुलासा अमान्य करण्यात आला. कंत्राटी तत्वावर नियुक्त असल्यामुळे त्यांच्या गैरवर्तनामुळे त्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. तसेच कर्तव्य कालावधीमध्ये कर्मचा-यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे या माध्यमातून ही सूचना सर्वाना देण्यात आली आहे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी निर्देश दिले असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी स्पष्ट केले आहे .