डोंबिवली :(प्रतिनिधी):-फेरीवाल्यांनी नेहमीच गजबजलेल्या डोंबिवली पूर्वेतील ग आणि फ प्रभाग तर पश्चिमेतील ह प्रभागातील स्टेशन परिसर गेल्या काही दिवसांपासून एकही फेरीवाला दिसत नसल्याने डोंबिवलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.महापालिकेच्या नव्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या आदेशामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी चांगलेच कामाला लागल्याने डोंबिवलीचा स्टेशन परिसरातील रस्ता मोकळा श्वास घेताना दिसत आहे.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभागात मागील वर्षभर फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरू आहे. हातगाडी चालक, पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक, सामान जप्ती आणि फौजदारी कारवाई सुरू आहे. ग प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त सोनम देशमुख,आणि फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी, सुनील सुर्वे हे तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहून ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त राहील याची काळजी घेत आहेत.अशीच कारवाई मागील काही दिवसांपासून फ प्रभागाने फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली,बाजीप्रभू चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर सुरू केली आहे. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनावरून ही कारवाई केली जात आहे. नेहमी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजून गेलेल्या चिमणी गल्ली, फडके रस्ता, बाजीप्रभू चौकात एकही फेरीवाला दिसत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले.
तसेच डोंबिवली पश्चिमेला स्टेशन बाहेरील परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त आहे. तरी काही फेरीवाल्यांनी रस्ता अडवून बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत असताना पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली. रस्ता अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना पाहून फेरीवाले पळून गेले.तर फुटपथाही अतिक्रमण विभागाने मोकळे केले. पालिका उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ह’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त स्नेहा करपे, पथकप्रमुख विजय भोईर व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. अशीच कारवाई यापुढे ही चालू राहील असे पथकप्रमुख विजय भोईर यांनी सांगितले.