अर्थमंत्रयांचा पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात एमआरआय मशीनसाठी ७.५ कोटी रू. निधी मंजूर
मुंबई (अजय निक्ते ) : राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचेकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात एमआरआय मशीन खरेदीसाठी ७.५ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सुमारे ५०० हून अधिक दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वितरण, ३५ हजार नागरिकांना चश्मे वितरण, ५ हजार नेत्ररूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासह नुकतीच लाईफ लाईन एक्सप्रेस या उपक्रमाच्या माध्यमातुन रोगनिदान, उपचार व निःशुल्क शस्त्रक्रिया त्यांनी करविल्या. चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले. सामान्य रूग्णालयासाठी नुकताच ९ कोटी रू. निधी त्यांनी मंजूर केलाय. चंद्रपूर जिल्हयातील घुग्गुस, पडोली, बेंबाळ, चिचपल्ली, मुल, दुर्गापूर, धाबा, विसापूर, पोंभुर्णा, साखरवाही, नांदगांव पोडे, बल्लारपूर याठिकाणी रूग्णवाहीका त्यांनी उपलब्ध केल्या. मुल येथे एनआरएचएम च्या सहाय्याने आरोग्य महामेळावा त्यांनी आयोजित केला व त्या माध्यमातुन मोठया संख्येने नागरिकांवर उपचार व शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. कॅन्सर, मुखरोग, दंतरोग व तत्सम आजारांबाबत शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन त्यांनी केले. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्हयात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकत्याच त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. हे कॅन्सर रूग्णालय वर्षभरात उभारण्यात येणार आहे.