मुंबई : वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा मुंब्रा-कौसा बाहयवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अवघ्या दोन महिन्यात करून सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी ) ने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग खुला झाल्याने जेएनपीटी येथून तसेच उत्तर भारतातून येणारी छोटी वाहने तसेच जडअवजड वाहने ठाणे शहरात न येता मुंब्रा बायपास मार्गाने मार्गस्थ होतील. ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोली टोलनाका भागात होणारी अवजड वाहनांची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिक आणि वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला.
पावसाळ्यात दरवर्षी मुंब्रा बायपासची प्रचंड दुरवस्था होते. जागोजागी पडणारे खड्डे आणि येथील रेतीबंदर पुलाच्या भागात पडणारे भगदाड अशा स्थितीमुळे पावसाळ्यात बायपासवरून वाहने चालवणे हे मोठे दिव्य असते. यंदाच्या पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी, यासाठी मुंब्रा बायपासच्या दुरूस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. त्यानुसार पुलाच्या ६०० मीटरच्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तब्बल दोन महिन्यानंतर दुरूस्तीच काम पूर्ण झाल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते फित कापून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे उड्डाणपुलाच्या लांबीमध्ये कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्यासाठी Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. अगदी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरीकांची होणारी गैरसाय व वाहतुकीचा खोळंबा टळणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील बाजूस डेक स्लॅब व गर्डरला पॉलिमर मॉस्टर, इपॉक्सी ग्राउटींग, फायर रेसिस्टेंट प्लास्टर आणि अँटी कार्बोनेशन रंगकाम हि कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच पुलाचे सर्व एकस्पानशन जॉईंट्स व रेल्वे ऑब्लिगेटरी गाळयाचे सर्व बेअरींग बदलण्यात आलेले आहेत.
कौसा बाहयवळणाच्या संपुर्ण लांबीमध्ये खराब असलेले काँक्रिट पॅनल्स काढून नव्याने मुंब्रा-व काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. जुने मोडकळीस आलेले कॅशबॅरियर काढून नव्याने कॅशबॅरियर बसविण्यात आलेले आहे. मान्सुनपुर्व गटारांची व मो-यांची साफसफाई करण्यात आलेली आहे. मध्य दुभाजक दुरूस्ती, रंगकाम व त्यामध्ये वृक्षारोपन करण्यात आलेले आहे. संरक्षक भिंतींचे रंगकाम व धर्मोप्लास्टीक रंगकाम करून संपुर्ण लांबीमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे.
सार्वजनिक बांधकाम (पीडब्लुडी) विभागामार्फत ०५ एप्रिल २०२३ पासून मुंब्रा बाय पास रोडच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. हा रस्ता बंद असताना विविध पर्यायी मार्गाने सर्व वाहनचालकांना जावे लागत होते. मुंब्रा बायपास बंद असल्याने जेएनपीटी बंदरातून सुटणारी अवजड वाहने ठाणे-बेलापूर, पूर्व द्रुतगती महामार्गाने घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करत होती. त्यामुळे अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगांनी नवी मुंबईच्या दिघा, ऐरोली टोलनाका येथे प्रचंड कोंडी होत असे. या कोंडीत काही मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागत होता. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर देखील परिणाम होत होता. आता मुंब्रा बायपास सुरु झाल्याने वाहतुक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार असून, प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अधिक्षक अभियंता विलास कांबळे, कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे, उपविभागीय अभियंता अमोल वळवी, शाखा अभियंता प्रसाद सनगर, कनिष्ठ अभियंता विकास जाधव व . राहूल कडपाते तसेच ठेकेदार मे. एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांनी विशेष परिश्रम घेऊन अवघ्या २ महिन्यांमध्ये हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे पीडब्लूडी विभागाचे कौतूक होत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर …
मुंब्रा बायपास रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे अंतर्गत पहिल्यांदाच Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC ) या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाच्या आधारे उड्डाणपूलावर उच्चश्रेणी काँक्रिटने ओव्हरले करणेचे काम यश्वस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष सहकार्याने, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच, कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. ( विलास कांबळे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे)