मुंबई, दि.२६- देशभरात दिवसेंदिवस होत चाललेली इंधन दरवाढ लक्षात घेता भविष्यात इंधनावरील वाहनांना प्रदूषणविरहित आणि बचतीचा योग्य पर्याय म्हणून शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेच्या पुढाकाराने आणि ए व्ही मोटर्स यांच्या माध्यमातून आज मुंबईतील पहिले ई-ऑटोरिक्षा विक्री दालन सुरू करण्यात आले. शिवसेना नेते, माजी मंत्री, खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते पियाजो अॅपे कंपनीच्या प्रवासी आणि मालवाहतुक या दोन्ही वर्गवारीतील ई-ऑटोरिक्षा वाहनांचे अनावरण आणि वाहने खरेदी केलेल्या ग्राहकांना चाव्यांचे वितरण यावेळी करण्यात आले.

केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने देखील ई-वाहन धोरणास यापूर्वीच मान्यता दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक आणि ग्राहकांची आर्थिक बचत या सर्व दृष्टीने विचार करता शासन देखील याकरीता विविध स्तरावर प्रोत्साहन आणि अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील गरज लक्षात घेता मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील प्रवासी आणि मालवाहतुक रिक्षाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिव वाहतूक सेनेने संघटनेच्या सदस्य ऑटोरिक्षा चालकांनादेखील ई-ऑटोरिक्षा वाहन खरेदीवर विशेष सवलतीचा लाभ देऊ केला आहे.

इंधनावर चालणार्‍या वाहनांमुळे होणारे मानवी शरीरास हानिकारक असे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि गोरगरीब रिक्षाचालकास कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा भविष्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरेल असे प्रतिपादन गजानन किर्तीकर यांनी यावेळी केले. शिवाय राज्यभर विविध ठिकाणी रिक्षानाक्यांवर ई-वाहनांविषयीची जागरूकता होणे देखील तितकीच गरजेची असून शिव वाहतूक सेनेने याबाबतीतही पुढाकार घ्यावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रसंगी राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त सचिन गिरी, शिव वाहतूक सेनेचे माजी सरचिटणीस मोहन गोयल, विधानसभा संघटक प्रमोद सावंत, संघटक कमलेश राय, पियाजो अॅपे कंपनीचे झोनल प्रमुख सुधांशु तलवार, विभागीय प्रमुख नितिन दिघडे, सारथी सुरक्षा प्रवक्ते विनय मोरे, युवा विभाग अधिकारी मयूर पंचाळ, ए व्ही मोटर्सचे संचालक अजय जैन, पीयूष जैन यांच्यासह परिसरातील ऑटोरिक्षा चालक मालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!