मुंबई : लोकसंख्या वाढ आणि भौगोलिक विस्तार यामुळे मुंबई महानगराच्या प्रशासनावर येणारा ताण नवीन नाही. त्यातून दैनंदिन व नवनवीन आव्हाने झेलून कामकाज करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सातत्याने मदत घेणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने क्रांतिकारी असे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जी/दक्षिण विभाग अंतर्गत वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करुन डिजीटल स्वरुपातील ‘प्रतिवरळी’ साकारण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या नागरी प्रशासनासाठी मोलाचा ठरणार आहे. यानिमित्ताने, थ्री डी मॅपिंग असणाऱया आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीमध्येही मुंबईचा प्रवेश झाला आहे.

वाढती लोकसंख्या व विस्तारणारा भौगोलिक परिसर पाहता मुलभूत नागरी सेवा-सुविधा पुरवणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, मोठे प्रकल्प राबविणे हे प्रशासकीय दृष्ट्या आणि इतरही कारणांनी मोठे आव्हान ठरते. त्यातच दैनंदिन कामकाज सांभाळून या सगळ्या गरजांची पूर्तता करताना नागरी प्रशासनाची दमछाक होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा तर मिळतोच, समवेत नागरी प्रशासन, प्रकल्प अंमलबजावणी इत्यादी वेगाने होवू शकते. हे ओळखून राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगर क्षेत्राचा डिजीटल स्वरुपात त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी म्हणजेच थ्री डी मॅपिंग करण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात म्हणून जी/दक्षिण विभागातील वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर डिजीटल थ्री डी तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड यांची मदत लाभली आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून प्रशासनाला वेग देतानाच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी देखील मदत होत असते. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जीआयएस, एसएपी, रोबोट, ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यापूर्वीच अवलंब केला आहे. त्यात थ्री डी मॅपिंगची भर पडली आहे. महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यानुरुप साधनांचा स्वीकार केला आहे. आता थ्री डी मॅपिंग करणारा मुंबईतील पहिला प्रशासकीय विभाग म्हणून देखील जी/दक्षिण विभागाची आता नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *